पाकिस्तानने भारताला शहाणपणा शिकविणे थांबवावे

पाकिस्तानची निर्मिती इस्लाम व हिंदुद्वेष या दोन स्तंभांवर झाली आहे. 74 वर्षांनंतरही यात कोणताच बदल झाला नाही व नजीकच्या काळात बदल घडून येण्याची शक्यता नाही. भारतीय उपखंडातील मुस्लिमांसाठी वेगळा देश निर्माण करण्यात यावा अशी मागणी करणारा ठराव 23 मार्च 1940 रोजी पारित करण्यात आला. यास लाहोर ठराव असे संबोधण्यात येते. याच्याच आधारे केवळ सात वर्षात पाकिस्तान नामक भस्मासुर निर्माण करण्यात आला. हा भस्मासुर अख्ख्या जगाला डोईजड झाला आहे.

लाहोर ठराव मंजूरीनंतर पाकिस्तान निर्मितीस वेग आला. (या ठरावात पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख नव्हता. ) त्यावेळेच्या अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांची या अनुषंगाने काय भूमिका होती , यावर दृष्टिक्षेप टाकणे उचित ठरेल. त्यांचे म्हणणे होते की – या महत्वाच्या अल्पसंख्य समूहाने स्वतःच्या सुरक्षेची हमी न मागता विलग होण्याच्या मागणीने मुख्य प्रश्नाची सोडवणूक न होता भविष्यातील दीर्घकालीन संघर्षाची पायाभरणी होईल. हे त्यांचे आकलन बिंबविण्यास्तव अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपला एक दूत 1941 साली भारतात पाठविला होता. या दूताने इंग्रज सरकार , काॅंग्रेस व मुस्लिम लीगच्या नेत्यांशी सल्लामसलत करत अमेरिकन अध्यक्षांचे चिंतन मांडत सर्व संबंधितांना सचेत केले होते. अशी दूरदृष्टी तत्कालीन भारतीय नेत्यांच्या ठायी नसल्याने व इंग्रजांना आपल्या कुटिल डावाद्वारे स्वतःचे हितरक्षण करावयाचे असल्याने देशाचे विभाजन घडून आले हे कटु सत्य आहे. मुस्लिमांना काय हवे ते दिल्यावर शेष भारत सुखाने नांदू शकेल ही आशा फोल ठरली. (अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या चिन्तनानुसार असे होणारच होते. ) आजपर्यंत ज्या समस्येचे निराकरण होवू शकले नाही ती समस्या अशाच विकृत मनोवृत्तीचा परिपाक आहे.

पाकिस्तानची निर्मिती कृत्रि़म बाबींवर आधारित आहे. देशनिर्मितीस भूगोल जसा आवश्यक आहे तसेच इतिहास , संस्कृती व समृद्ध वारशाची देखील गरज असते. भूगोलाव्यतिरिक्त इतर बाबींचा त्यांच्याकडे अभाव आहे. उपासना पद्धतीत बदल घडून आल्याने त्यांनी आपला समृद्ध वारसा नाकारला. आखाती व अरब देश त्यांना खरे मुस्लिम मानत नाहीत. असे असतांनाही पाकिस्तानी राज्यकत्र्यांचा आटापिटा मात्र आपली मुळं तिथे शोधण्याचा दिसतो. मात्र हा प्रयत्न केविलवाणा ठरतो. अशा या वैचारिक गोंधळात सापडलेला देश इतरांसाठी जाचक ठरल्यास आश्चर्य ते काय? आज त्या देशाची अवस्था सुकाणू नसलेल्या जहाजासारखी झाली आहे.

फाळणीनंतर काॅंग्रेसने अशी भूमिका घेतली की परिस्थितीच्या रेट्यामुळे देशाचे विभाजन मान्य करावे लागले. इतकेच नव्हे तर ही भूमिका त्यांनी 74 वर्ष जनमानसावर बिंबवली. ही विशिष्ट परिस्थितीत घडलेली एकमात्र घटना असून तिचा विस्तार व पुनरावृत्ती होवू शकत नाही. पाकिस्तानला मात्र ही संकल्पना मान्य नाही. त्यांच्या मते काश्मीर समस्या ही फाळणीचे अपूर्ण उद्दिष्ट आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानने घुसखोरी केल्यावर भारतीय सैन्याने त्यांना बरेच मागे रेटले. आपल्या सैन्यास यश मिळत असतांनाही काही कारण नसतांना आपण एक जाने. 1948 रोजी संयुक्त रा. संघात तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूकडून दीर्घ युक्तिवादाच्या अंती सुरक्षा परिषदेने 13 ऑगस्ट 1948 रोजी ठराव संमत केला. पाकिस्तानने या ठरावाचे कधीच प्रामाणिकपणे पालन केले नाही. आपल्या माथी खापर फोडत ते सदा त्यांच्या जनतेची दिशाभूल करत आले.
1 ऑगस्ट 2021 पासून भारत संयुक्त रा. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार असल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला व त्यांनी अगोचरपणा करत भारताला शहाणपणा शिकविण्याचे दुःसाहस केले. 31 जुलै 2021 रोजी पाकिस्तानी विदेशी खात्याकडून पत्रकार परिषदेत असे सांगण्यात आले की – आम्हाला अशी आशा आहे की अध्यक्षपद स्वीकारल्यावर भारत या संघटनेने पारित केलेल्या ठरावाशी बांधील राहील. तसेच काश्मीरसंबंधी झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करेल. आम्ही भारताला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो की या ठरावाचे पालन करत त्यांनी याची अंमलबजावणी करावी. भारतासाठी व जगासाठी यापेक्षा वेगळे हास्यास्पद विधान असू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की पाकिस्ताननेच या ठरावाला कधीच हरताळ फासला आहे. या ठरावातील संबंधित उपकलमांची शब्दावली प्रस्तुत करणे उपयुक्त ठरेल. ती पुढीलप्रमाणे –

Part-2

Truce agreement

A-1 As the presence of troops of the Pakistan in the territory of the state of Jammu and Kashmir constitutes a material change in the situation since it was represented by the Government of Pakistan before the security council, the Government of Pakistan agrees to  withdraw its troops from that state.

A-2 The Government of Pakistan will use its endeavour to secure the withdrawl  from the state of Jammu and Kashmir of tribesmen and Pakistan nationals not normally resident therein who have entered the state for the purpose of fighting. 

यातील मुख्य भाग असा आहे की सैन्य माघारी घेण्यास पाकिस्तानला सांगण्यात आले, भारताला नव्हे. पाकिस्तानी नागरिक व सैन्य लढण्याकरिताच काश्मीरात दाखल झाले होते हे या ठरावाद्वारे संयुक्त रा. संघाने मान्य केले आहे. पाकिस्तानने सैन्य कधीच मागे घेतले नाही. याचमुळे आता हा ठराव निरर्थक ठरला आहे. पाकिस्तानला मात्र सदैव याचेच तुणतुणे वाजवत त्यांच्या जनतेला भ्रमात ठेवायचे आहे. आज पश्चिमी जगत व अधिकांश मुस्लिम देश या प्रश्नावर पाकिस्तानची पाठराखण करतांना दिसत नाही. पाकिस्तान मात्र हेका सोडायला तयार नाही. त्यांना हा प्रश्न सतत धगधगत ठेवायचा आहे. असे केल्याने त्या देशातील राजकारण्यांचे व सैन्याचे पोटभरण होते. पाकिस्तानी जनता मात्र यात होरपळली जात आहे याची त्यांना अजिबात चिंता नाही.

पाकिस्तान सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. पुढील पाच वर्षांनंतर त्या देशाला भीषण पाणिटंचाईला सामोरे जावे लागणार आहे असे तज्ञ मंडळी ठासून सांगत आहेत. तेथील राजकारण्यांनी मात्र हा प्रश्न पोरकटपणाच्या स्तरावर आणून ठेवला आहे. गेल्या महिन्यात नॅशनल असेंब्लीत सिंध व पंजाब प्रांताच्या राजकारण्यांनी एकमेकावर पाणी पळविण्याचा आरोप करत जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.

कारगिल युद्धाच्या शेवटी युद्धबंदी स्वीकारली म्हणून तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना टीकेचे धनी व्हावे लागले. यावर त्यांचे म्हणणे होते की , भारताने त्यांची समुद्रवाट रोखून धरल्याने त्यांच्याकडे फक्त सहा दिवस पुरेल इतका तेलाचा साठा शिल्लक होता. आज त्या देशाचे भारताशी युद्ध सुरू नसतांनाही या आघाडीवर त्यांची परिस्थिती 1999 पेक्षाही जास्त गंभीर झाली आहे. ताज्या वृत्तानुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब , बलुचिस्तान व खैबर पक्तुनवा या प्रांतात केवळ तीन ते पाच दिवस पुरेल इतकाच इंधनाचा साठा शिल्लक होता. सिंध प्रांतात हा साठा तीस दिवस पुरेल इतका होता. अशी परिस्थिती यामुळे ओढवली की आखाती देशांनी हात आखडता घेतला. तसेच चढ्या भावाने तेल खरेदी करणे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे झाले. इराणने बलुचिस्तानलगतची त्यांची सीमा बंद केल्याने त्या देशातून चोरीच्या मार्गाने पाकिस्तानात येणारे तेल बंद झाले. मतितार्थ हाच की सर्व समस्यांसाठी फक्त भारताला दोष देत त्यांना आपला कार्यभाग साधता येणार नाही. इतका शहाणपणा शिकण्याची त्यांची इच्छा नाही. पण स्वतःची पात्रता नसतांना भारताला शहाणपणा शिकविण्याची खुमखुमी मात्र जात नाही. पाच वर्षांनंतर हा देश भकास झालेला असेल का ? हे सांगण्यास कुणा ज्योतिषाची गरज नसावी.

सतीश भा. मराठे

Leave a Reply