इम्रान खान – सुलतान – ए – बेआब्रू

1992 साली कोणालाही अपेक्षा नसतांना केवळ नशिबाने साथ दिल्यामुळे इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी क्रिकेट चमूने विश्वचषक जिंकून सर्वांना चकित केले होते. या विजयाने एका रात्रीत इम्रान खान त्या देशाचे लाडके हिरो ठरत ते जणु सातव्या आसमानात पोचले. या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होत कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले व ऑगस्ट 2018 मध्ये सैन्याच्या भक्कम पाठिंब्यामुळे ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले. त्या देशातील विरोधक मात्र ते इलेक्टेड पंतप्रधान नसून सिलेक्टेड पंतप्रधान आहेत अशी बोचरी टीका करत त्यांना अपमानित करीत आले आहेत. आज त्यांची अवस्था ‘ आसमान से टपकें और खजूर में अटकें ’ अशी झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव इम्रान खान नियाझी असे आहे. 16 डिसेंबर 1971 रोजी ले. जन. ए. ए.के.नियाझी यांच्या नेतृत्वाखाली 93000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्याच्या पूर्व विभागाचे प्रमुख ले.जन. जगजितसिंग अरोरा यांच्यापुढे रणागती पत्करल्याने आज पाकिस्तानात कोणीही नियाझी नाव लावायची हिंमत दाखवत नाही. अर्थातच इम्रान खान ही याला अपवाद नाहीत. परंतु नाव लावले नाही म्हणून नाचक्की व फजिती होण्याचे थोडीच टळते ! गेल्या चार महिन्यांपासून त्या देशातील सर्व विरोधी पक्ष इम्रान खान यांना पदावरून हटविण्यासाठी एकवटले आहेत. अनेक शहरात मोठ्या जाहीर सभांमधून ‘ गो नियाझी गो ’ अश्या घोषणा देत त्यांची भलामण शरणागत नेते अशी करण्यात येत आहे. अनेक विरोधकांनी त्यांना ‘ यू टर्न पंतप्रधान ’असे शेलकी विशेषण लावत सतत घायाळ केले आहे. गेल्या पावणे तीन वर्षात त्यांच्यावर अनेकदा अपमानित व खजिल होण्याचे प्रसंग ओढवले आहेत. असे बेआब्रू होण्याची मालिका खण्डित होण्याची चिन्हं दिसत नाहीत.

दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानवर एक बाका व लज्जास्पद प्रसंग ओढवला. लंडनस्थित एका विमान कंपनीकडून पाकिस्तानने दोन विमाने भाडे तत्वावर घेतली होती. दीर्घकाळपर्यंत या विमानांचे भाडे चुकते न केल्याने मलेशियाचीं राजधानी क्वलालंपूर येथे विमानातील प्रवाशांना खाली उतरवून कंपनीने हे विमान ताब्यात घेतले. पाकिस्तानचा जिगरी दोस्त समजला जाणारा मलेशिया देखील त्यांच्या मदतीला येऊ शकला नाही. जगात अशी नाचक्की झाल्याची उदाहरणे अपवादानेच आढळतात. पाकिस्तानला नाक घासत व अपमानित होत पैसे चुकते केल्यानंतर वाटाघाटीनंतर सदर विमान परत मिळू शकले. गेल्या काही वर्षात विविध अंतर राष्ट्रीय न्यायाधिकरणाद्वारे पाकिस्तानला अडचणीत आणतील असे निवाडे दिल्या गेले. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान एफ.ए.टी.एफ. या संस्थेद्वारे त्यांना ज्या प्रकारे करड्या यादीत टाकले आहे त्यातून बाहेर पडण्याचे जिवापाड प्रयत्न करीत आहे. दहशतवादाला आपला पाठिंबा नसल्याचा केविलवाणा दावा त्यांनी करून पाहिला. यासाठी काही महिन्यांपूर्वी त्या देशातील दहशतवादी नेत्यांना तुरुंगात डांबण्याचे नाटकही करण्यात आले. जग मात्र या कशावरही विश्वास ठेवायला तयार नाही.

पाकिस्तानची अभूतपूर्व बेइज्जती होण्याचा आणखी एक प्रसंग याच महिन्यात घडला. तो देखील शेजारी देश श्रीलंकेकडून. पंतप्रधान इम्रान खान यांच्या 22 फेब्रु. पासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्याची आखणी करतांना पाकिस्तानद्वारे अशी मागणी करण्यात आली की 24 फेब्रु. रोजी त्यांचे लंकेच्या संसदेत भाषण आयोजित करण्यात यावे. लंकेने ही मागणी अगोदर मान्यही केली. परंतु दौरा सुरू होण्याच्या 5 दिवस अगोदर नियोजित भाषण रद्द करण्यात येत असल्याची सूचना संसदेच्या अध्यक्षांद्वारे देण्यात आली. श्रीलंकेतील इंग्रजी वृत्तपत्र ‘ दि एक्स्प्रेस ’ यांच्या कथनानुसार इम्रान खान आपल्या भाषणात काश्मीर प्रश्नावर बोलतील अशी भीती वाटायला लागली, ज्यामुळे भारताची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. असे होणे त्यांना परवडणारे नसल्याने भाषणच रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वृत्तपत्राद्वारे असा युक्तिवाद मांडण्यात आला की, पाक पंतप्रधानांना संसदेला संबोधित करण्याची संधी दिल्यास ती कृती त्यांना भारतीय पंतप्रधान श्री. मोदींच्या स्तरावर नेण्यासारखी होईल. असे संकेत जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी सदर धोका टाळला. हे भारताच्या सक्रिय कूटनीतीचेच यश मानावे लागेल. ऑगस्ट 2018 पासून इम्रान खान व पाकिस्तानची कशाप्रकारे व्यापक बेइज्जती , नाचक्की व फजिती झाली यावर दृष्टिक्षेप टाकणे उचित ठरेल.

पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत 28 व 29 ऑक्टोबर 2020 या कालावधीत जे घडले त्याने त्या देशाचा भेसूर चेहरा पुन्हा जगापुढे आला. तेथील इम्रान खान मंत्रिमंडळातील मंत्री व विरोधी पक्षनेते यांनी एकमेकांचे जे वस्त्रहरण केले ते केवळ अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल. या त्यांच्या चाळ्यांमुळे सर्वांचेच चेहरे बेनकाब झाले. त्याचप्रमाणे यातून अनेक सत्येही बाहेर पडलीत जी पाकिस्तानला दीर्घकाळपर्यंत अडचणीत आणणार आहेत. 28 ऑक्टोबर रोजी नॅशनल असेंब्लीत जो ठराव मंजूर झाला त्याने त्या देशाची जी नाचक्की व फजिती झाली ती विसरणे शक्य नाही. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राॅन यांच्या कथित इस्लामविरोधी वक्तव्याने तेथील सर्व नेत्यांचा तोल गेला व ते सैरभैर झालेत. गेल्या 73 वर्षांत जहाल इस्लामिक विचारधारेशिवाय पाकिस्तानी राज्यकत्र्यांनी जनतेला काहीच दिले नाही हे जळजळीत सत्य या अनुषंगाने पुन्हा एकदा उजागर झाले. आपण इस्लामच्या रक्षणार्थ काहीही करून कोणत्याही थराला जाऊ शकतो हे दाखविण्याची चढाओढ सुरू झाली. घाईघाईत मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी पॅरिस स्थित पाकिस्तानी राजदूताला परत बोलविण्याचा ठराव नॅशनल असेंब्लीत एकमताने मंजूर झाला. यातील ग्यानबाची मेख पुढे येताच सर्व नेत्यांचे चेहरे काळवंडले व त्यांना काही सुचेनासे झाले. या ठरावातील फोलपणा उघड झाल्याने जगात पाकिस्तानचे जे हसे झाले त्याला तोडच नाही. पाकिस्तानी राजदूताने पॅरिसमधून प्रस्थान केल्याच्या घटनेला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. आधीच्या राजदूताच्या जागी दुसऱ्या राजदूताची नेमणूक तेथील परराष्ट्र खात्याला करणे शक्य झाले नाही . याचाच अर्थ असा की राजदुताला परत बोलविण्याचा ठराव मंजूर झाला तेव्हा पॅरिसमध्ये पाकिस्तानी राजदूतच अस्तित्वात नव्हता. अस्तित्वात नसलेल्या राजदूताला परत बोलविण्याचा ठराव मंजूर करून तेथील राजकीय पक्षांनी बावळटपणाचे कीर्तीमानच स्थापित केले आहे असे म्हणावे लागेल. हा ठराव मांडण्यामध्ये दस्तुर खुद्द पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री यांचाही समावेश होता. शहा मेहमूद कुरेषी यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची अनेक कारणे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सौदी अरेबिया व तेथील सुलतानांबद्दल जी निर्वाणीची भाषा वापरली त्याने पाकिस्तानला आपला दीर्घकालीन मित्र गमवावा लागला. इस्लामिक राष्ट्र संघटना पाकिस्तानचे काश्मीरविषयक धोरण उचलून धरत नाही हा त्यांचा मुख्य आरोप होता. या संघटनेचे नेतृत्व सौदी अरेबिया अनेक वर्षांपासून करत आला आहे याने शहा महमूद कुरेषी यांचा तिळपापड होऊन कुटनैतिक चतुराई व डावपेच खुंटीला टांगल्या गेले. सौदी भूमिकेने वैफल्यग्रस्त होत इम्रान खान यांनी तुर्की व मलेशिया या देशांची संधान साधण्याचे पाऊल उचलून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. या कृतीमुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला दूर लोटणे सुरू केले. इस्लामिक देशांच्या संघटनेत आजपर्यंत सौदी अरेबियाचाच दबदबा कायम राहिला आहे. पाकिस्तानने तुर्की व मलेशिया यांच्याषी हातमिळवणी केल्याने पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ पहात आहे असे संकेत गेल्याने सौदी अरेबियाचे महत्त्व कमी होण्याची भीती त्यांना भेडसावू लागली. याचा तात्कालिक परिणाम असा झाला की सौदी अरेबियाने पाकिस्तानला जे कर्जवाटप केले आहे त्यातील एक बिलीयन डाॅलर्सचे भुगतान पाकिस्तानने तात्काळ करावे असे फर्मान सोडण्यात आले. पाकिस्तानला नाक मुठीत धरून चीनकडून उसनी रक्कम घेत सौदी कर्जाची परतफेड करावी लागत अपमानित व्हावे लागले.

28 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत जी दुसरी घटना घडली त्याचे वर्णन न भुतो न भविष्यति असेच करावे लागेल. गेल्या 73 वर्षांत त्या देशाच्या राजकारण्यांनी पाकिस्तानी सेना ,गुप्तचर संघटना आय.एस.आय. यांची लक्तरं वेषीला टांगण्याची हिम्मत दाखविली नव्हती. ती हिम्मत या दिवशी दाखविण्यात आली. त्या दिवशीच्या विरोधी पक्षीय नेत्याच्या वाग्बाणांनी तेथील राज्यकर्ते, सेना व गुप्तचर संघटना हे सर्व प्रचंड हादरले.

पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज गटाचे नेते व नॅशनल असेंब्लीचे माजी सभापती अयाज सादीक यांनी इम्रान खान सरकार, सैन्य प्रमुख व आय.एस.आय.ची पिसं काढण्यास सुरूवात केल्याने अवघे सभागृह अचंबित झाले. अयाज सादिक हे 1 मार्च 2019 या दिवशीचा घटनाक्रम सभागृहापुढे उलगडत होते. या दिवशी पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय हवाई दलाचा वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याची सुटका होणार होती. सुटकेचा निर्णय आधीच झाला होता असे अयाज यांचे म्हणणे होते. हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला याची कारणमीमांसा त्यांचे परराष्ट्रमंत्री विरोधी पक्ष नेत्यांपुढे मांडत होते. अयाज यांच्या म्हणण्यानुसार त्या सर्वदलीय नेत्यांच्या बैठकीपुढे पंतप्रधान इम्रान खान यांना हजर राहायचे होते, पण त्यांनी ती कठीण कामगिरी परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरैषी यांच्यावर ढकलून स्वतः पळ काढला. ज्या इमारतीत ही बैठक पार पडली त्याच इमारतीत इम्रान खान उपस्थित होते. मात्र त्यांनी तोंड लपवणेच पसंत केले. सदर बैठकीत पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा उपस्थित होते. अयाज सादीक यांनी भाषणादरम्यान असा गौप्यस्फोट केला की उपस्थित पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवा यांचे पाय थरथरत होते व कपाळ घामाने चिंब झाले होते. परराष्ट्रमंत्री कुरैषी काकुळतीला येत विरोधी पक्ष नेत्यांना सांगत होते की, ‘‘खुदा के लिए अभिनंदन को उसके घर जाने दो वरना भारत उस दिन रात को 9 बजे पाकिस्तानपर बडा हमला करने वाला है।’’ या अयाज यांच्या विधानातील एक एक बिंदू जोडत गेल्यास जी साखळी पूर्ण होते त्याने चित्र स्पष्ट उभे राहते. अभिनंदनला पकडल्यापासून साठ तासांच्या आत त्याला भारताकडे सुपूर्द करण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. असे त्यांनी अर्थातच आपल्याप्रती प्रेम उफाळून आल्याने नक्कीच केले नाही. आपण उगारलेल्या बडग्यामुळे त्यांना असे करणे भाग पडले असेच अयाज यांना ध्वनीत करावयाचे होते. अयाज यांचे म्हणणे खरे मानले तर एक बाब स्पष्ट होते. ती म्हणजे भारताने रात्री 9 वाजताची जी डेडलाईन दिली होती त्याच्या 3 मिनीटं अगोदर अभिनंदनचे अटारी सीमेद्वारे भारतात आगमन होणे याला योगायोग म्हणता येणार नाही.

1 मार्च 2019 हा दिवस पाकिस्तानसाठी आणखी एका कारणास्तव अपशकुनी व दुर्दैवी ठरला. भारतात इंडोनेशियानंतर सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असल्याने आपणास मुस्लिम राष्ट्रसंघटनेच्या (ओ.आय.सी.) बैठकीस निमंत्रित म्हणून उपस्थित राहू द्यावे अशी मागणी भारत 1969 सालापासून करत होता. त्या वर्षी मोरोक्कोची राजधानी रब्बात येथे या संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही प्राप्त झाले होते .त्यानुसार भारतीय प्रतिनिधी फकरूद्दीन अली अहमद मोरोक्कोत दाखल झाले. ऐन वेळी पाकिस्तानच्या दबावापुढे झुकत आपल्याला दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याने फकरूद्दीन अली अहमद यांना अपमानित होत परत यावे लागले.

1 मार्च 2019 रोजीचे दृष्य मात्र याच्या पूर्णपणे उलट होते. आपण मागणी न करताही दुबई येथे आयोजित इस्लामिक राष्ट्र संघटनेच्या बैठकीस विशेष निमंत्रित म्हणून भारताला बोलविण्यात आले. त्यानुसार भारताच्या परराष्ट्रमंत्री स्व. सुषमा स्वराज यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रभावशाली व ओघवत्या भाषणाद्वारे भारताची सर्वसमावेषक भूमिका बैठकीपुढे मांडली. अर्थातच पाकिस्तानची खुर्ची रिकामी होती हे वेगळे सांगायला नको. सुषमा स्वराज यांची उपस्थिती सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमीरात या देषांनी पाकिस्तानपुढे झुकण्यास नकार दिल्यानेच संभव झाली. आपल्यासाठी ही ऐतिहासिक प्राप्ती होती.
पाकिस्तानपुढे अनेक अडचणी ठाण मांडून बसल्या आहेत तर आपल्यापुढे पाकिस्तानला घेरून नामोहरम करण्याची मोठी संधी आहे. येथेच आपल्या परराष्ट्रनीतीची कसोटी लागणार आहे.

सतीष भा. मराठे

Leave a Reply